वेंगुर्ले : 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जि. प. केंद्रशाळा मठ नं. 1, ता. वेंगुर्लाचे पदवीधर शिक्षक गौरव शंकर नाईक यांच्या ‘जादू विभाज्यतेची’ या शैक्षणिक प्रतिकृतीने शिक्षक प्रतिकृती प्राथमिक या गटातून वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
2 पासून 20 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्यांची सुबक साहित्याच्या आधारे मांडणी, 20 पासून 40 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या ओळखण्याची तंत्रे, संख्यांचा लसावि काढण्याच्या आधुनिक पद्धती, 200 पर्यंतच्या मूळ संख्या सहज ओळखणे, स्वनिर्मित एक्सेल सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विभाजक ओळखणे, खास शिक्षकांसाठी विभाज्यता घटकाचे अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त अशी मूल्यमापन पुस्तिका अशी अनेक या शैक्षणिक प्रतिकृतीची वैशिष्ट्ये आहेत.
या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रदर्शनाला भेट देऊन शिक्षक गौरव शंकर नाईक यांच्या ‘जादू विभाज्यतेची’ या शैक्षणिक प्रतिकृतीचे विशेष कौतुक केले.



