कुडाळ : भल्याभल्यांना धडकी भरवणाऱ्या अथांग समुद्रात सूर मारून पोहणे म्हणजे एक मोठं धाडस आहे. मात्र याच अथांग समुद्राच्या कुशीत शिरून कुडाळ हायस्कूलच्या सहावीत शिकणाऱ्या शमिका चिपकर या मुलीने विश्वविक्रम केला आहे. सिंधुदुर्गातील निवती बीच येथील समुद्रात 40 किलोमीटर अंतर कमीत कमी वेळात म्हणजेच दहा तास 31 मिनिट 11 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित करून आपले नाव वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंदवले आहे .

शमिका ही एवढ्या कमी वेळात 40 किलोमीटर अंतर पोहणारी सर्वात लहान मुलगी ठरली आहे. तिच्या या शौर्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेकडून घेण्यात आली असून कुडाळ हायस्कूलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर यांच्याहस्ते मेडल प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन शमिकाचा सन्मान करण्यात आला.






