सावंतवाडी : आजच्या धकाधकीच्या आणि आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा. त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. ऐवळे म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायालय आणि मीडिया या दोघांकडून जनतेला न्याय मिळतो. त्यामुळे पत्रकारांचे महत्त्व अबाधित असून त्यांनी आपल्या बरोबर आपल्या कुटुंबीयांचीही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सकस आहार आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. मुकुंद अंबापुरकर, डॉ. संदीप सावंत डॉ.सागर जाधव तसेच जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तर राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाबद्दल माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी अशा प्रकारचे आरोग्य शिबिर राज्यात ठिकठिकाणी घेऊन पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले.
रक्तदाता प्रतिष्ठान आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी गजानन नाईक आणि अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनाही ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रक्तदाता संघटनेचा रक्तदान करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान असल्याचे सत्कारमूर्ती प्रकाश तेंडुलकर आणि देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अभिमन्यू लोंढे म्हणाले, पत्रकारांच्या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाता संघटनांचा केलेला सन्मान ही उल्लेखनीय बाब आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. कोणताही मोबदला न घेता रक्तदान करून ही मंडळी अनेकांचे प्राण वाचवत आहेत. आज मोबदल्याशिवाय कुठचीही सेवा मिळत नाही आरोग्य सेवा देताना डॉक्टर्स जशी विना मोबदला सेवा देतात. तशी सेवा रक्तदाते संघटना रक्तदान करून देत असल्याबद्दल त्यांनी रक्तदान करणाऱ्या संघटनांचे कौतुक केले.
यावेळी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. ३ डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा ८५ वा वर्धापन दिन असून या दिवशी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेतले जाते. रक्तदान शिबिराच्या ऐवजी रक्तदान करणाऱ्या संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान तालुका पत्रकार संघाच्या वतीने केला जात असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत सचिव मयूर चराठकर यांनी केले.
या कार्यक्रमास तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय देसाई, सदस्य राजन नाईक, हेमंत मराठे, उमेश सावंत,महिला पत्रकार दिव्या वायंगणकर, अनुजा कुडतरकर,शैलेश मयेकर, अजित दळवी नागेश पाटील, अभय पंडित, तसेच विजय नाटलेकर, जिलानी आगा आदी पत्रकार आणि त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी पंधराहून अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोग्य तपासणी केली.





