मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्यामागे दोन कारण सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे दुकानांवरील मराठी पाट्या. सर्वोच्च न्यायालयाने दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात निर्णयानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांच्या भेटीचा दुसरा महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे टोल. ऑक्टोबर महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोल मुद्द्यावरून भेट घेतली होती. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना काही आश्वासनं दिली होती.
दुकानांवरील ठळक अक्षरातील मराठी पाट्या हा मुद्दा सध्या तापलेला आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. प्रशासनाडून मुख्यत: मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई थातूर-मातूर असल्याचा आरोप मनसैनिकांचा आहे. त्यामुळे मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.





