ठाणे : महाराष्ट्र शासन आपल्या सोबत आहे, गरजूंनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, यातून सुदृढ सशक्त समाज निर्मिती करु या, असे आवाहन बार्टी, पुणे या संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसिध्दी मेळावा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), ठाणे कार्यालयाने टाऊन हॉल येथे आयोजित केला होता, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनीष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक विकास कुंटूरकर, व्यवस्थापक वंदना सावंत, अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुसुमताई बाबासाहेब गोपले, रमेश समुखराव आदि मान्यवर उपस्थित होते.

महासंचालक सुनील वारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना बार्टीच्या योजनांविषयीची विस्तृत माहिती दिली. योजनांचा अभ्यास करून समजून घेऊन त्याचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले. ते म्हणाले, शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी ही संस्था कार्यरत आहे. विकासाचा मार्ग प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो, त्यामुळे अभ्यास करताना प्रत्येकाने आपल्या विकासाचा मार्ग स्वतंत्रपणे ठरविणे गरजेचे आहे. पालकांनी त्या दृष्टीने आपल्या पाल्यांना पाठिंबा द्यायला हवा. बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या तयारीसाठी पूर्ण खर्चासहित विनामूल्य मार्गदर्शन दिले जाते. बार्टीतील आरक्षणांतर्गत पाच टक्के जागा मातंग समाजासाठी राखीव आहेत. मात्र अजूनही या समाजात जनजागृतीची अत्यंत गरज आहे. समता दूतांच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. बार्टीच्या वेबसाईटवर शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करुन गरजू लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ जरुर घ्यावा.
या मेळाव्याच्या माध्यमातून उपस्थितांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक श्री.मनिष सांगळे आणि महाव्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. उपस्थितांच्या शंकांचे समाधानकारकपणे निरसन केले.
महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची वेळेत तसेच पूर्ण परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद सांगवीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), ठाणे च्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





