…अन्यथा शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलन.! ; शेतकरी बागायतदार संघाचे सुरेश गावडे यांचा प्रशासनाला इशारा.

34

बांदा : यंदा शेतकऱ्यांना पीक विमा बराच उशिराने मिळाला. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप मिळालेलाही नाही आणि पीक विमा पुन्हा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर आहे. ई पिक नोंदणी नेटवर्क अभावी वेळेत होत नाही. सर्व्हर काम करत नाही. ई पीक नोंदणी सातबारा मिळतं नसल्याने विमा पॉलिसी होत नाही. विम्याचे पैसे उशिराने मिळाले त्याचप्रमाणे पॉलिसी करण्यास मुदत मिळावी. अन्यथा शेतकरी प्रखर आंदोलन उभारतील, असा इशारा सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी संघाचे सचिव सुरेश गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

ते म्हणतात, दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात विमा भरपाई मिळते. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मिळाली. काही जणांना अद्यापही मिळालेली नाही. मुळात काजू, आंबा बागायतदारांचे लहरी हवामानामुळे अतोनात नुकसान झाले. मिळणारी भरपाई मात्र तुटपुंजी आहे. जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आल्याने खिशातून विमा भरणे शक्य नाही.

ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने ई पिक नोंद करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय गेले चार दिवस ॲपचा सर्व्हर डाऊन असल्याने ई पीक नोंद करणे शक्य झालेले नाही. ई पीक नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अशा अवस्थेत पीक नोंदणी करणे व वीमा भरणे अशक्य आहे. त्यामुळे हजारो शेतकरी वीमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वीमा भरण्यास किमान १० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली आहे. मात्र, अद्याप पर्यंत कोणतेही लेखी आश्वासन मिळालेले नाही. साहजिकच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विमा भरणेस मुदतवाढ मिळावी, अन्यथा शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा सुरेश गावडे यांनी प्रशासनाला दिला आहे