देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे येथील भगवान कार्तिक स्वामी मंदिरात असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी कृतिका नक्षत्रावर भगवान कार्तिकेय यांच्या दर्शनाचा पवित्र योग जुळून येतो. भगवान कार्तिकेयांचे दर्शन याच दिवशी महिलांना घेणे अत्यंत शुभ मानले जाते. इतर वेळी महिलांना भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेता येत नाही. मात्र पुरुष मंडळींना कार्तिक स्वामी यांचे दर्शन कधीही घेता येते.

यावर्षी रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजून ५३ मिनिटापासून सोमवारी २७ नोव्हेंबर दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत म्हणजे जवळपास २२ तास १८ मिनिट दर्शनाचा पवित्र योग होता. या वेळात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयांतील असंख्य भाविकांनी भगवान श्री कार्तिकेय यांचे दर्शन घेतले . या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सुलभतेने दर्शन घेता येईल अशी व्यवस्था हिंदळे कार्तिक स्वामी उत्सव समितीचे व्यवस्थापक अँड देवानंद गोरे व त्यांच्या सहकाऱ्याच्या वतीने करण्यात आली होती.





