सहा ठिकाणी हल्ले, ६० तास मृत्यूचे तांडव आणि 166 जणांचा जीव गेला! ; मुंबई हल्ल्याच्या ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

54

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजीचा दिवस तसा जगासाठी सर्वसामान्यच, पण मुंबईसाठी मात्र हा दिवस काळा दिवस ठरला. कराचीहून समुद्रामार्गे आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं, अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानच्या दहा दहशतवाद्यांनी सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईचा जीव कोंडीत पकडला. दहशतवाद्यांनी मुंबईतील सहा ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यानंतर एनएसजीच्या कमांडोंनी मुंबई पोलिसांच्या मदतीने या दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली. आज त्या घटनेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊयात-

पाकिस्तानातील कराचीहून 10 दहशतवादी समुद्राच्या मार्गाने मुंबईत घुसले. ते दोन दोनच्या गटाने मुंबईत घुसले. सुरूवातीला झालेल्या गोळीबारानंतर हा गँगवॉरचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला, नंतर मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं लक्षात आलं. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांचे काही धाडसी अधिकारी शहीद झाले.

लिओपोल्ड कॅफे – 

सीएसटीच्या जवळ असलेल्या लिओपोल्ड कॅफेमध्ये दोन दहशतवादी घुसले. लिओपोल्ड कॅफे हे विदेशी नागरिकांच्या आवडीचे ठिकाण. युरोपियन आणि इस्त्रायली नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. या कॅफेमध्ये जाऊन दहशदवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या ठिकाणी 10 जणांचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –

नेहमीच गर्दीने गजबजलेले सीएसटी स्थानक त्या दिवशीही भरलेलं होतं. अनेकजण आपापल्या प्रवासाच्या प्रतीक्षेत होते. त्यावेळी अजमल कसाब आणि इस्माईल खान दे दोन दहशतवादी सीएसटीमध्ये शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. या ट
ठिकाणी 58 जणांचा मृत्यू झाला.

ओबेरॉय हॉटेल –

ओबेरॉय हॉटेल हे अनेकांच्या आवडीचे हॉटेल. या ठिकाणी दोन दहशतवादी घुसले. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा होता.

कामा हॉस्पिटल –

सीएसटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवादी घुसले. कामा हॉस्पिटलच्या बाहेरच्या झाडामागे लपलेल्या दहशतवाद्यांनी एक पोलीस गाडी येताना पाहिली आणि त्यांनी त्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांतील धाडसी अधिकारी अशोक कामटे आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर हे शहीद झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी ती कार ताब्यात घेतली.

नरिमन हाऊस –

नरिमन हाऊस म्हणजे खबाड (छबाड) हाऊस हे इस्त्रायली नागरिकांचे ठिकाण समजले जाते. या ठिकाणी ज्यू लोकांच्या मदतीसाठी एक केंद्र बांधले होते. तसेच याकेंद्रात ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी आणि एक सिनेगॉग आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी या ठिकाणाला लक्ष्य केलं.

ताजमहाल हॉटेल –

समुद्राच्या किनारी असलेले ताजमहल हॉटेल हे शंभर वर्षाहून जुने हॉटेल. या ठिकाणी देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत परदेशी नागरिकांची कायमच गर्दी असते. त्यामुळे या हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले आणि गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराने आणि बाँबहल्ल्याने या हॉटेलमधून आगीचे लोट येत होते. ऐतिहासिक अशी ही इमारत जी मुंबईची शान समजली जाते, ती जळत होती आणि जग ते पाहत होते. या हॉटेलमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात 31 लोकांचा जीव गेला.

मुंबई पोलिसांनी एनएसजी कमांडोंच्या मदतीने ताजमधील सर्व दहशतवाद्यांना ठार केले. त्यामध्ये एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन हे शहीद झाले. तब्बल 60 तासांनंतर मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी ठार झाले आणि मुंबईसह देशाने सुटकेचा निश्वास टाकला.

अजमल कसाब जिवंत सापडला –

मुंबईवरील हल्ल्यामधील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी म्हणजे अजमल कसाब. मुंबई पोलिसांच्या तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कसाबला जिवंत पकडलं. त्यामध्ये ओंबाळे शहीद झाले. पण त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे पाकिस्तानचा बुरखा मात्र फाडला गेला.