परवा आमच्या परिचयातील कुटुंब दक्षिण भारताचा प्रवास करून आले त्यांनी येताना काही मोत्याचे दागिने आणले होते. साहजिकच ते दाखविण्यासाठी आमच्या घरी आले. मला तरी ते दागिने खूपच आवडले परंतु ते महाग असावेत म्हणून त्यांची चौकशी ही केली नाही.
ते परत गेल्यावर मी सौ. ला विचारले , ट्रिपला गेल्यावर ही मंडळी एवढा खर्च कसा काय करू शकतात ? ती म्हणाली अहो ते काही खऱ्या मोत्यांचे नाहीत Cultured मोत्यांचे आहेत म्हणजेच खोट्या मोत्यांचे आहेत.
मी एकदम चमकलो, “Cultured म्हणजे खोटे !”
आणि विचार करू लागलो हे आपल्या दैनंदिन जीवनातही खरे आहे की, काय आणि जसजसा विचार करू लागलो तसे चित्र स्पष्ट होत गेले. होय, Cultured म्हणजे खोटेच ! साधे हॉटेल मध्ये जेवायला गेलो तर हाताने जेवण करणे अगदी नैसार्गिक आहे परंतु काटे चमच्यांनी खाणे हे cultured, एखाद्या व्यक्तीने चुकीची कृती केली की तिथल्या तिथे सणसणीत शब्दात प्रतिक्रिया देणे हे नैसर्गिक पण ते असभ्यपणाचे समजले जाते याऐवजी गोड गोड शब्दात निषेध व्यक्त करणे हे सुसंस्कृतपणाचे म्हणजेच खोटेपणाचे होय.
एकूण आपले सर्व वागणेच खोटेपणाच्या दिशेने वाटचाल करणारे आहे. सुसंस्कृतपणा म्हणजेच खोटेपणाचा बुरखाच नव्हे काय ? आणि मग खोटेपणाच जर महत्वाचा असेल तर आपण सत्याचा आग्रह तरी कां धरतो ? आपल्याला खावेसे वाटते ते खायचे नाही, बोलावेसे वाटते ते बोलायचे नाही, जे करावेसे वाटते ते करता येत नाही. अशी मुस्कटदाबी म्हणजेच आपले तथाकथित सुसंस्कृत वर्तन होय. म्हणूनच कदाचित काही मानसशास्त्रज्ञ संस्कृतीला विकृती मानत असावेत.
आता आपण किती सभ्यपणे वागायचे ते प्रत्येकाने आपापल्या परीने ठरवावे. सभ्यपणाच्या बुरख्याखाली स्वतः च्या नैसर्गिक भावना किती दडपून टाकायच्या याचाही विचार व्हावा ! तरीही सुसंस्कृतपणा म्हणजे खोटेपणा म्हणणे कसे तरीच वाटते हे खरे !
डॉ. ह. ना. जगताप





