अहमदाबाद : विश्वचषकाच्या महायुद्धात रोहित शर्माचा भारतीय क्रिकेट संघ निर्विवाद वर्चस्व गाजवत आलाय. अशातच आज विश्वचषकातील अंतिम लढत ऑस्ट्रेलियासोब होणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑसी संघ यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना पाहायला मिळणार आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच रोहितसेना जबरदस्त फॉर्मात आहे. आतापर्यंत एकही सामना न गमावलेली टीम इंडिया कांगारूंचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज आहे. अशातच ऑस्ट्रेलियालाही कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी आजचं आव्हान तसं सोपं नसणार, असं असलं तरी टीम इंडियाला मात्र विजयी पताका फडकवावीच लागेल. कोट्यवधी भारतीयांसाठी, 2003 चा बदला घेण्यासाठी आणि टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी. हो… हो… राहुल द्रविडसाठी टीम इंडियाला जिंकावंच लागेल.
राहुल द्रविड… भारतीय क्रिकेट संघाचा धमाकेदार फलंदाज, संयमी कर्णधार आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक. राहुल द्रविड 1999 आणि 2003 या दोन्ही विश्वचषकांमध्ये खेळाडू म्हणून टीम इंडियाचा भाग होता. 2007 च्या विश्वचषकात प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी त्याला कर्णधार बनवलं, परंतु गट फेरीतच पराभूत झाल्यानं भारतीय क्रिकेट संघ बाहेर पडला. आता 16 वर्षांनंतर ‘मिस्टर डिपेंडेबल’ पुन्हा एकदा वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासोबत आहे. पण यावेळी तो पडद्याआडून रणनीती बनवत आहे. राहुलच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू तयार होत आहेत. एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून जवळपास 11 हजार धावा करणाऱ्या द्रविडला प्रशिक्षक म्हणून 2007 चा कलंक पुसून टाकायचा आहे. दुसरीकडे, टीम इंडियाही त्याला विजयासह निरोप देऊ इच्छित आहे. विशेष म्हणजे, भारतीय प्रशिक्षक म्हणून त्याच्या दोन वर्षांच्या कराराचा शेवटचा दिवसही आज म्हणजे, रविवारी आहे. UAE मधील 2021 T20 विश्वचषकाच्या ग्रुप लीगमधून संघ बाहेर पडल्यानंतर राहुल द्रविडचा करार सुरू झाला होता.
राहुल द्रविड पुन्हा प्रशिक्षक होणार?
जर टीम इंडिया वर्ल्डकप जिंकली तर मात्र, राहुल द्रविड यांनाच संघ प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतील असं बोललं जात आहे. परंतु, जे द्रविडला ओळखतात, त्यांना सर्वांनाच हे नक्कीच माहीत आहे की, आजच्या विजयाचा द्रविडला किती अभिमान वाटेल. भारतीय क्रिकेट संघातील त्याच्या एका माजी सहकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर एका वृत्तवाहिनीला सांगितंल की, “जॅमी (राहुल द्रविड यांचं टोपणनाव) खूप स्वाभिमानी आहे. 2007 च्या विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर त्यानं कर्णधारपद सोडलं नाही. परंतु, काही महिन्यांनी इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेली आणि एकदिवसीय मालिकाही चांगली राहिली. इंग्लंडमधील कसोटी विजयानंतरच द्रविड कर्णधार पदावरून पायउतार झाला. आजही, जर टीम इंडिया जिंकली तर बीसीसीआय द्रविडला नवा करार देऊ शकते.
बाहेरच्या जगापासून अलिप्त, आपल्या कामात मग्न –
भारतीय क्रिकेट संघाची विश्वचषक मोहीम सुरू होण्याच्या काही दिवस आधी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बंगळुरूमध्ये आपल्या काही जुन्या मित्रांची भेट घेतलेली. त्यामुळे द्रविड तणावमुक्त पाहायला मिळाले, त्यामुळे ते संपूर्ण विश्वचषकातील दबावाला तोंड देण्यासाठी सज्ज होते. कारण द्रविड पुढील महिनाभर बाहेरील जगापासून दूर राहणार होते. मोठ्या स्पर्धांपूर्वी खेळाडूंनी बाहेरील गोंगाटापासून दूर राहण्याबाबत आपण आजही ऐकतो. परंतु, जरी द्रविड आता खेळाडू नसले तरी त्यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या प्रशिक्षण म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी राहुल द्रविड स्वतःला तणावापासून दूर ठेवत टीम इंडियासाठी खास रणनिती आखत होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.




