सातारा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. जरांगे पाटील महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. आज त्यांनी साताऱ्यात सभा घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान उदयनराजेंनी मनोज जरांगे यांना कानमंत्र दिला. मनोज जरांगे म्हणाले, “कानात दिलेला हा आशिर्वाद मी सांगणार नाही. कारण कानात दिलेला आशिर्वाद सांगायचा नसतो. ते मनात ठेवून लढायचं असतं. महाराज साहेबांचा आशिर्वाद घेतला. लढण्यासाठी शक्ती पाहिजे अन् या गादीनं (सातारा) महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गोरगरीबांच्या पाठीवर हात फिरवला आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी आशिर्वाद घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”
महाराजांच्या आशिर्वादामुळे आंदोलनाला १०० टक्के दिशा मिळणार. छत्रपतींच्या शिवरायांच्या वंशजांचा आशिर्वाद मिळाला यामुळे आंदोलनाला दिशा मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांच्या सातारा जिल्ह्यात आज ४ सभा आहेत.
ओबीसी समाज आक्रमक-
मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याला विरोध होत आहे. ओबीसीतील सर्वपक्षीय नेत्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथे सभा घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
मराठ्यांना आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) सध्याच्या आरक्षणात कपात करू नये, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. त्यांनी मनोज जरांगे यांनाही लक्ष्य केले. ओबीसी समाजाच्या मेळाव्यात भुजबळ यांनी मराठा हे कुणबी जातीचे दाखविणारे किती रेकॉर्ड सापडले, असा सवाल केला.
छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राजेश राठोड, भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक प्रमुख ओबीसी नेत्यांनी अंबड येथे ‘ओबीसी भटके विमुक्त जात आरक्षण बचाओ एल्गार सभा’ आयोजित केली होती.





