Home आंतरराष्ट्रीय मॅक्सवेल Vs कुलदीप!, फायनलमध्ये कोण देणार कोणाला मात? ; आकडेवारीत कुणाचं पारडं...

मॅक्सवेल Vs कुलदीप!, फायनलमध्ये कोण देणार कोणाला मात? ; आकडेवारीत कुणाचं पारडं जड.?

31

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप 2023 मधील अंतिम सामन्यात काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दोन्ही संघातील कोणते खेळाडू चमकतील याची देखील चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील ग्लेन मॅक्सवेल हा ज्वालामुखी सारखा खेळाडू आहे. तो निद्रिस्त असेल तर काही नाही, मात्र तो जर फुटला तर काय होतं? हे अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात आपण सर्वांनी पाहिले.

ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानचे 292 धावांचे आव्हान पार करताना एकच्याने 201 धावा ठोकल्या. त्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 91 अशी झाली असताना, क्रॅम्प येत असतानाही सामना खेचून आणला. हा ज्वालामुखीसारखा असणारा ग्लेन मॅक्सवेल फायनलमध्ये भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

मात्र या मॅक्सवेल नामक डोकेदुखीवर भारताकडेही एक औषध आहे. या औषधाचं नाव आहे कुलदीप यादव! विस्फोटक मॅक्सवेलला कसं नियंत्रणात ठेवायचं हे कुलदीप यादवला चांगलच जमतं. तो मॅक्सवेलपेक्षा कायम एक पाऊल पुढंच असतो.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा ऑस्ट्रेलियासोबत झाला होता. या सामन्यात कुलदीप यादवने मॅक्सवेलचा 15 धावांवर त्रिफळा उडवला होता. त्यानंतर याच वर्ल्डकपमध्ये मॅक्सवेल हा दक्षिण अफ्रिकेविरूद्ध साखळी फेरीत केशव महाराजच्या गोलंदाजीवर तर सेमी फायनलमध्ये तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला.

कुलदीप यादवचा राँगवन हा फलंदाजाला बुचकळ्यात टाकतो. मात्र फायनलमधील मॅक्सवेल विरूद्ध कुलदीप हा मुकाबला अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल यावर अवलंबून असणार आहे.