सावंतवाडी : ‘ जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..!’ अशीच प्रचिती वारंवार देते सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी आणि त्यांचे कार्यकर्ते.
सावंतवाडी शहरामध्ये गेले कित्येक दिवस भटकत असलेला कर्नाटक येथील प्रशांत नामक 37 वर्षीय युवक थोडासा मतिमंद असल्यामुळे शहरातील जनतेला त्रास ठरत होता. त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम झाली असून पायाला होल पडून गॅंग्रीन झालेले आहे. त्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. बुधवारी सकाळपासून तो तलावाच्या काठी उन्हातच पडून होता. हे पाहून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी त्याची दखल घेतली. दरम्यान त्याला असंख्य वेदना होत होत्या. कपडेही घाण झाले होते व अंगातून दुर्गंधी वाहत होती. त्यामुळे सर्वप्रथम त्याची केस दाढी करून त्याला स्वच्छ आंघोळ घालून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
सावंतवाडी शहरातील सलून चालवणारे यूपी येथील युवक शैलेश ठाकूर यांनी सामाजिक भान राखून त्याची केस दाढी केली तसेच होमगार्ड राजन सांगेलकर व सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पी आय ऋषिकेश अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य केले.

- उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून आता त्याला 108 ने अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. सदर बेवारस पेशंट बरा झाल्यानंतर योग्यरित्या कार्यवाही करून त्याला सविता आश्रममध्ये पाठवण्याचे जबाबदारी सामाजिक बांधिलकी घेणार असल्याचे रवी जाधव म्हणाले. ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्याचे काम सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व राजू मसुरकर यांनी पाहिले. याप्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.





