पवारांच्या दिवाळीत यंदा ‘अजित दादा’ दिसणार नाहीत.! ; स्वतःच सांगितलं ‘हे’ कारण.

81

मुंबई : डेंग्यूची लागण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून घरीच उपचार घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा बारामतीत होणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या दिवाळीत दिसणार नाहीत. आजारपणामुळे आपल्यापासून दूर रहावं लागत आहे, डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे यावेळी आपल्याला भेटता येणार नाही असा संदेश अजित पवारांनी दिला आहे.

राज्यभर दिवाळीचा उत्साह असताना सर्वाचं लक्ष लागलं असतं ते बारामतीच्या पवार कुटुंबीयांच्या दिवाळीकडे. दिवाळीच्या सणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येतं आणि दिवाळी साजरी केली जाते. यंदा मात्र अजित पवार त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झालंय.

दर दिवाळीला आपणा सर्वांना भेटत असतो, दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सूचनेनुसार आपल्याला भेटता येणार नाही असं अजित पवारांनी त्यांचे कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.