सिंधुदुर्गनगरी : राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज धडक मोर्चा निघणार आहे. ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’ कर्मचाऱ्यांना मिळणारी जुनी पेन्शन व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी जिल्हा निहाय सहकुटुंब धडक मोर्चा आज ८ नोव्हेंबर रोजी काढला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा मोर्चा रवळनाथ मंदिर ओरोस येथून सकाळी दहा वाजता सुरू होईल. त्यानंतर सदरील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील प्रांगणामध्ये येईल या मोर्चामध्ये आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र मंडळी यांचेसह सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे.एनपीएस(NPS) कर्मचाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन आणि आपल्या पुढील भवितव्याचा विचार करून सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी.
जुनी पेन्शन धारक आणि पेन्शनर्स यांनीही बेसावध राहू नका.आपली पेन्शन भविष्यात धोक्यात आहे हे लक्षात घ्या. नेहमीप्रमाणे आपण सर्वांच्या पुढे राहून हे आंदोलन यशस्वी करायचे आहेच. शिवाय आपल्या पाठीला पाठ लावून NPS धारक सर्व कर्मचारी सुद्धा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील आणि हे आंदोलन यशस्वी करतील.
हा मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’ असा व्हावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक सर्वांनी सहकुटुंब कोणताही संकोच न करता आंदोलनात सहभागी व्हा.ही आरपारची लढाई आहे.
”आता नाही तर कधीच नाही, एकच मिशन जुनी पेन्शन, माझे भविष्य माझी लढाई” असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष राजन कोरगांवकर , सरचिटणीस
सत्यवान माळवे यांनी केले आहे .
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, सचिन माने सहसचिव उपस्थित होते.





