छत्तीसगड-मिझोरम विधानसभेसाठी आज मतदान.! ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

43

रायपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आज मंगळवारी (7 नोव्हेंबर) छत्तीसगडमधील 20 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. मिझोराममधील सर्व 40 जागांसाठी मतदान होणार आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील 20 जागांपैकी अनेक जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागात आहेत. 20 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि एक अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

छत्तीसगडमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात

छत्तीसगडमधील 10 जागांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. तर उर्वरित जागांसाठी सकाळी ८ वाजता मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. तर मिझोरममध्ये मतदान 7 वाजता सुरू होईल आणि 4 वाजेपर्यंत चालेल. छत्तीसगडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदानासाठी २५,२४९ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 25 महिलांसह 223 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या कालावधीत अंदाजे 40,78,681 मतदार मतदान करतील. यामध्ये 19,93,937 पुरुष, 20,84,675 महिला आणि 69 तृतीय पंथींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी 5304 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

छत्तीसगडमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नक्षलग्रस्त बस्तर विभागातील 12 मतदारसंघात मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 40,000 जवानांसह 60,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

तर मिझोराममध्ये देखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, येथील 8.57 लाखांहून अधिक मतदार 174 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यामध्ये 18 महिलांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मधुप व्यास यांनी सांगितले की, मिझोराममधील सर्व 1,276 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील.