देवगड : देवगड को-ऑपरेटीव्ह बँक लि. या बँकेची २०२३-२०२८ पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी झाली आहे. त्यामुळे देवगड अर्बन बँकेच्या सत्तेच्या चाव्या भाजप-राष्ट्रवादी प्रणित शिवम पॅनल की उद्धव ठाकरे गट शिवसेना- काँग्रेस प्रणित सहकार समृद्धी पॅनलकडे जातील, याचा फैसला उद्या मतमोजणीत अंति स्पष्ट होणार आहे. बँकेची मागील दोन टर्म ही निवडणूक बिनविरोध झाली होती. आणि यावेळी सर्वात कमी मतदान झाल्याने विद्यमान सत्ताधारांची धाकधूक वाढली आहे.
रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत या बँकेचे एकूण ११५४३ सभासद मतदारांपैकी ३३४७ मतदारांनी मतदानादाचा हक्क बजाविला. बँकेचे एकूण मतदान २८.९९% टक्के मतदान झाले .रविवारी सकाळ पासून दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते व उमेदवार गटागटाने तालुक्यातील देवगड, पडेल, नारिंग्रे येथील मतदान केंद्रानजिक लावण्यात आलेल्या बुथवर एकत्रित येऊन मतदारांना केंद्र नंबर काढून देत होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार व कार्यकर्ते आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच अन्य मतदारांशी संपर्क साधून मतदानाकरिता प्रोत्साहन केले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षा, टेम्पो आदी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.

भाजप राष्ट्रवादी प्रणित शिवम पॅनेलचे नेते माजी आमदार अँड. अजित गोगटे यांनी शिवम पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार एकतर्फी विजयी होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. तर सहकार समृद्धी पॅनेलचे नेते संतोष तारी, गणेश गावकर, जोशी यांनी मतदान कमी झाल्याचा फायदा सहकार समृद्धी पॅनेलला होणार आहे. मतदारांची विद्यमान संचालक मंडळावर नाराजी असल्यानेच मतदानचा टक्का घसरला असल्याचे संतोष तारी म्हणाले. देवगड मधील ५ मतदान केंद्रावर ५८०४ मतदारांपैकी १८९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर नारिंग्रे मतदान केंद्रावर १६३८ पैकी ७०२ मतदारांनी मतदान केले. पडेल मतदान केंद्रावर २२६९ मतदारांपैकी ६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर तालुक्या बाहेरील कासार्डे मतदान केंद्रावर ८८७ पैकी १३ तर कुडाळ मतदानकेंद्रावर ९२० पैकी १०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
देवगड, पडेल, नारिंग्रे, कुडाळ, कासार्डे या पाच केंद्रांवर ही निवडणूक पार पडली आहे. शिवम पॅनलचे १३ उमेदवार रिंगणात असून सहकार समृद्धी पॅनेलचे १० उमेदवार रिंगणात आहेत. शिवम पॅनेलची निशाणी “कपबशी” व सहकार समृद्धी पॅनेलची निशाणी “मासा” असून रविवारी ती मतपेटीत बंद झाली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता देवगड येथील देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयात ही मतमोजणी होणार आहे. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडल्याने दुपारी 1 नंतरच अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.





