अभिमानास्पद..! – जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक गणेश दर्शन स्पर्धेत सौ. तृप्ती पार्सेकर यांचे स्पृहणीय यश.!

66

सावंतवाडी : युरेका सायन्स कणकवली, कोकण नाऊ व विद्यानिकेतन कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश दर्शन जिल्हास्तरीय स्पर्धेत कळसुलकर हायस्कूलच्या निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. तृप्ती नकुल पार्सेकर यानी तृतीय क्रमांक पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे.

कोकणातील उपलब्ध नैसर्गिक वस्तू झाडे, पाने, फुले, झावळ्या इ. चा वापर करून पर्यावरण पुरक देखावे केलेल्या जिल्ह्यातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये सौ. पार्सेकर यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
परीक्षकांनी परीक्षणासाठी जे निकष लावलेले होते त्यामध्ये मुर्तीची प्रमाणबद्धता, रंगसंगती व त्या अनुषंगाने केलेली पर्यावरणपूरक आरास याचा विचार करून परीक्षण केले.
परीक्षक म्हणून कवी, लेखक, अनुवादक, पत्रकार, चित्रकार तसेच सतत तेहतीस वर्षे लोकसत्ता, लोकमत, नवशक्ती, पुण्यनगरी अशा वृत्तपत्रात काम केलेले तसेच सह्याद्री वाहिनीच्या वतीने विविध स्पर्धांचे परीक्षण केलेले शिवाजी गावडे व बंगळुरू स्थित राष्ट्रीय किर्तीचे चित्रकार प्रकाश कबरे यांनी काम पाहिले.
सौ. पार्सेकर यांना बागबगीच्या, परसबाग तसेच टाकावूपासून टिकाऊ देखण्या वस्तू तयार करण्याचा छंद असून झाडाफुलांपासून त्या अनेक वस्तू बनवतात. त्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.