कोकणातील काजू बागायतदार उध्वस्त होण्याच्या वाटेवर, लक्ष कोण देणार..? 

बांदा : परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणून काजू पिकाकडे पाहिलं जाते. मात्र आज शासनाची उदासीनता व नैसर्गिक आपत्तीमुळे काजू बागायतदार रसातळाला जात आहेत. शासन आणि लोक प्रतिनिधी यांना लक्ष देण्याची मानसिकता नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या पिकाचे प्रमाण फार कमी झाले आहे . आज हा दर एक किलो 125 रुपये आहे. गेल्या वर्षी हाच दर 145 ते 148 रुपयावर स्थिरावला होता. मुळात यावर्षी उत्पन्न कमी आहे आणि जर दार कमी असेल तर मात्र शेतकरी खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ  बसवु शकणार नाही.

काजूला मोहोर आल्यावर बुरशी व अन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. अवेळी  पडणारा पाऊस, अवेळी वाढणारी उष्णता व थंडी या सर्वच गोष्टीचा काजू पिकावर दुष्परिणाम होतो. काजू बागायतदारांचा आजच्या घडीला परकीय काजू बी ची होणारी आयात त्रासदायक ठरत आहे. परकीय काजू बी थेट मार्केटमध्ये पोचते. त्या ठिकाणाहून  कारखानदार तिची उचल करतात. या काजू बी चा दर स्थानिक दरापेक्षा कमी असतो. मात्र त्यातून काजूपासून  तयार झालेला काजूगर स्थानिक काजू गराच्या भरमसाठ दराने विकला जातो.

या सर्व गोष्टीकडे प्रशासनाने व राजकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा कोकणातील काजू बागायतदार उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.