अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई, १ कोटीचा मुद्देमाल जप्त.! ; राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकाची कामगिरी.

41

बांदा : राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना दहाचाकी बंद बॉडीच्या वाहनासह अं1 कोटी 2 लाख 8 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 30 ऑक्टोबर 2023 रोजी विजय सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क. महाराष्ट्र राज्य, सुनिल चव्हाण संचालक ( अं.व.द. ) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर, वैभव वैद्य प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रौ 09 च्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना आज पहाटे 5 च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे दहाचाकी बंद बॉडीचे वाहन क्र. NL- 01AG-9252 या वाहनाची तपासणी केली असता दहाचाकी बंदबॉडीचे वाहनास पाठीमागील दोन्ही बंद दरवाज्यांना बॉटल सील लावलेले दिसून आले. वाहन चालकाने त्या वाहनामध्ये मशिनरी स्क्रॅप भरलेले असल्याचे सांगितले. वाहनचालकाने दिलेल्या ट्रान्सपोर्ट बिल्टी नुसार संशय आल्याने त्याच्याजवळ अधिक विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वाहन क्र. NL-01/AG-9252 या वाहनाच्या मागील दरवाज्यावर लावलेले बॉटल सील तोडून दरवाजा उघडून पाहिले असता सदर वाहनामध्ये ड्रीम्स डिस्टीलरीज गोवा निर्मित गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे रॉयल ग्रेन्ड माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.ली एकुण 1000 कागदी पुठ्याचे वॉक्स 48000 बाटल्या मिळून आल्या. या प्रकरणी जगदीश देवाराम बिश्नोई, रा. भाटीप, पोस्ट-पमाना, ता. रानिवाडा, जि. जालोर, राजस्थान सध्या रा. 22/5, हेमकुंज सोसायटी, मातावाडी, एलएच रोड, सुरत गुजरात यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यामध्ये अं. रु. 72,00,000/- किंमतीचे मद्य तसेच रु.30,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन, एक मोबाईल रु. | 8000/- किंमतीचा असा एकुण अं. रु.1 कोटी 2 लाख 8 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, दिपक वायदंडे, प्रसाद माळी जवान व रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली प्रदीप रास्कर हे करीत आहेत.