सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उभारण्याचा मानस : वैभव नाईक
मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या छत्रपतींच्या शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात येत आहे. या सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कामाची पाहणी केली. त्यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे सिंहासन कोरले जात आहे. दरम्यान लवकरच शिवराजेश्वर मंदिराचे हे काम हातात घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक ठेवा जपत हे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उभारण्याचा मानस आहे, असे यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले.
यावेळी मंदिराचे विश्वस्त सयाजी सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, वायरी भूतनथ सरपंच भगवान लुडबे, सिद्धेश मांजरेकर, सन्मेष परब, दत्ता पोईपकर, अनंत पाटकर यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सिंहासनाचे काम कोल्हापूर येथील तज्ञ कारागीर अशोक सुतार आणि सहकारी करीत आहेत. त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली असून कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील नवीन मूर्ती ही त्यांनी साकारली आहे.




