जयपूर : काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसमधील हे बंड तर मोडून काढले आणि आता तर निवडणुकीच्या तोंडावर या गटाशी जुळवून घेत त्यांना उमेदवारी देण्याचे मान्य केले.
याउलट, भाजपमध्ये पहिली यादी जाहीर झाल्यावर असंतोषाचा महापूर आला आहे. तो रोखण्यात राज्यातील व दिल्लीतील नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. राजस्थानमध्ये प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्ता बदल होत असतो. या रिवाजाप्रमाणे भाजपची स्थिती बळकट असायला हवी. परंतु स्थानिक नेतृत्वावरून दिल्ली व जयपूरमधील नेत्यांमध्ये झालेला बेबनाव अद्यापही दूर न झाल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहेत.
भाजपने ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात सात खासदारांना उमेदवारी दिली. भाजपच्या श्रेष्ठींची ही चाल त्यांच्या अंगलट आली आहे. खासदार राज्यवर्धन राठोड, देवजी पटेल सारख्या नेत्यांना भाजपचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवत आहेत.
यामुळेच राजस्थानची दुसरी यादी भाजपने लांबणीवर टाकली आहे. हा असंतोष संपविण्याची जबाबदारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टाकली आहे. परंतु अद्यापही वाद कायम आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केलेला नाही. त्यांच्या समर्थकांनाही उमेदवारी नाकारण्यात येत आहे.
‘जादूगार’ गेहलोत
काँग्रेसमध्ये ‘जादूगार’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षातील असंतोष संपविण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या समर्थकांनी बंड केल्यानंतरही त्यांच्याशी वितुष्ट न ठेवता त्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे मान्य केले.
यामुळे पक्षातील उमेदवार ठरविताना दोन्ही गटात कोणताच वितंडवाद झाला नाही. सध्या राजस्थानमध्ये काही जागांवर एकमत झालेले नाही. मात्र, नेत्यांशी जुळवून घेत गेहलोत यांनी काँग्रेसची निवडणूक रणांगणातील स्थिती सध्या तरी मजबूत केली आहे.





