रोहा उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, सुविधांची गरज.!

56

रोहा : शशिकांत मोरे

रोहा तालुक्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १३ जागा रिक्त ; रिक्त जागांचा तालुक्यातील आरोग्यसेवेवर परिणाम

रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय रोहा येथिल डॉक्टरांची ८ पदे मंजूर आहेत. पैकी फक्त ३ पदे भरलेली असून ५ पदे ही कॉन्ट्रॅक्ट द्वारे भरलेली आहेत. या ५ पैकी एका काँट्रॅक्ट डॉक्टरकड़े माणगावचे चार्ज असल्याने रोहा रुग्णालयात सहा. अधीक्षक, तज्ञ डॉक्टरांसह ज्युनियर क्लार्क, आणि वर्ग ४ चे कामगार या रुग्णालयाला कायमस्वरूपी मिळण्याची गरज आहे. या जागा भरल्यागेल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार मिळण्यास अडचणी येणार नाहीत. उपजिल्हा रुग्णालयातिल आरोग्यसेवेवर याचा परिणाम होणार नाही.

वरणोपचारक (ड्रेसर) नाही –

अपघात विभागात वरणोपचारक (ड्रेसर) हे वर्ग ४ मध्ये येणारे पद रीक्त असल्याने ती जबाबदारी इतरांना पार पाडावी लागते, अपघात झालेला किंवा दुखापत झालेला रुग्ण प्रथोमोपचारासाठी आल्यावर त्याची अनेकदा गैरसोय होते.

लोकांनी दिलेल्या मशिन्स बिनकामाच्या –

येथील धाटाव एमआयडीसी मधिल कंपन्यांनी आणि रोहेकर नागरिकांनी तातडीच्या वेळी गरजू रूग्णांची सोय व्हावी यासाठी विविध प्रकारच्या रुग्ण उपयोगी ऑक्सिजन वैगरेच्या मशिन्स उपजिल्हा रुग्णालयात डोनेट केलेल्या आहेत, परंतू तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने या मशिन्स बिनकामाच्या पडून आहेत.

लहान मुलांचे डोसेस नाहीत –

उपजिल्हा रुग्णालयात गेल्या ३ आठवड्यांपासून लहान मुलांचे औषधांचे डोस उपलब्ध झालेले नाहीत, परिणामी लहानग्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. त्याचबरोबर दुखापत झालेल्या रुग्णांना टाके टाकायचे वैगरे छोट्या मोठ्या गोष्टी कधी उपलब्ध असतात तर कधी नसतात.

रिक्त पदांचा तपशील –

वैद्यकीय अधिकारी १, सामान्य फिजिशियन १, शल्य चिकित्सक (सर्जन ) १, भूल तज्ञ १ ( सद्या ऑन कॉल बोलावले जाते ), अधिपरिचारिका २, कक्ष सेवक २, शस्त्रक्रिया परिचर १, वरणोपचारक १, शिपाई १, आदी रिक्त पदे भरण्याची उपजिल्हा रुग्णालयात गरजेचे आहे.

रुग्णालय समस्या आणि मागण्या –

– हॉस्पिटल मधील कारभार हा काही वेळा शिकाऊ डॉक्टरांच्या आधारे चालतो. त्यामुळे रोहेकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
– उपजिल्हा रुग्णालय रोह्यात कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची पदे भरण्यात यावी.
– “आयुष” च्या माध्यमातून नियुक्त डॉक्टर्स यांची उपयुक्तता व सेवेतील असमर्थता लक्षात घेऊन त्यांच्या जागी कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती व्हावी.
– विंचू दंश, सर्पदंश व श्वानदंश यावर आवश्यक त्या औषधांचा साठा काही वेळा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत.
– साथीच्या आजारांसाठी लागणारी प्रतिजैविके यांचाही साठा काही वेळा अत्यल्प असल्याने अनेकदा ती औषधे खाजगी दुकानातून घ्यावी लागतात.
– उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णावर येथेच योग्यते उपचार करण्यापेक्षा रुग्णाला अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्याचा आल्याचे अनेकदा दिसून येते.

रुग्णालया संबंधित काही प्रश्न आणि रिक्त पदांच्या माहिती आणि रुग्णालयाचे अधिक्षक यांची बाजू कळावी यासाठी वैद्यकीय अधिक्षिका सौ. अंकिता मते खैरकर यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी अशी माहिती तोंडी सांगता येणार नसल्याचे व त्यासाठी रुग्णालयात अर्ज करावे लागेल, असे सांगितले.

  • रिक्त जागांचा तालुक्यातील आरोग्यसेवेवर परिणाम –

रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातिल मंजूर एकूण ४६ जागांपैकी १३ जागा रिक्त आहेत. परिणामी तालुक्यातील आरोग्यसेवेवर याचा परिणाम होत आहे, तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यांची गैरसोय होत आहे. उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर त्याचा अतिरिक्त ताण येत आहे. तालुक्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती खालीलप्रमाणे असून कोकबन मध्ये ५ , आंबेवाडी केंद्रात १ , नागोठणे मध्ये ७ जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. तिन्ही प्रा.आ. केंद्रात औषधांसाठा मुबलक असून त्याची तपासणी गेल्या ९ ऑक्टोबरला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

महामार्गावरील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ अँबुलन्स नाही –

नागोठणे हा गाव मुंबई गोवा महामार्गावर असून या प्राथमिक आरोग्य केंद्र या महामार्गाला लागून आहे, रस्त्यावरील अपघातानंतर रुग्णांना याठिकाणी प्रथमोपचारासाठी आणले जाते, परंतु या केंद्रात १६ पैकी ७ जागा रिक्त आहेत, शिवाय नागोठणेसाठी 108 अँबुलन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना तातडीच्या उपचार मिळताना मोठी गैरसोय होते.

कोलाडात १०८ अँबुलन्समुळे वाचले चिमुरडीचे प्राण –

कोलाड येथे झालेल्या अपघातावेळी आत्यवश्यक सेवेतील १०८ नंबरवर संपर्क साधला असता आधी नॉटरीचेबल लागले, नंतर मात्र अँबुलन्सवरील सेवत असलेले डॉ नागे आणि चालक स्वप्नील बाकाडे यांनी गंभिर जखमी असलेल्या चिमुकलीला विलंब न लावता अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे तिच्यावर योग्य उपचार करून पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात आल्याने त्या चिमुकली प्राण वाचले. योग्य वेळेत डॉ नागे आणि चालक स्वप्नील बाकाडे यांनी अत्यावश्यक सेवा दिल्यान ती चिमुकली मृत्युच्या दारातून परत आल्याचे बोलले जात आहे.

“तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातिल रिक्त पदांबाबत लेखी अहवाल आणि मागणीपत्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे दिलेला आहे. उपलब्ध मनुष्यबळातुन नागरिकांना सर्वोतोपरी वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे”.
– आदित्य शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी, रोहा

“उपजिल्हा रुग्णालय रोहा येथिल रिक्त पदांसंदर्भात अहवाल आणि मागणीपत्र आरोग्य विभागाकडे दिलेला आहे. याबाबत पाठपुरावा करीत आहोत. येथिल चार्ज अतिरिक्त असला तरी आपण सप्ताहातील ३ दिवस येथे येत असतो. एन आर एच एम आणि काँट्रॅक्ट बेसिसवर उपलब्ध मनुष्यबळाद्वारे रुग्णांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे.”
– एन. के. राहिरे, प्रभारी सहा. अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय रोहा

“तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाची परिस्थिती गंभीर आहे, शासनाने व सरकारने लवकरच कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टर्सची पदे भरावीत, जिल्हा रुग्णालयाचे सीएस यांच्या अधिकाराखाली येत असलेल्या वर्ग ४ च्या नियुक्त्या तरी तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी आहे.!”
– नितीन परब, अध्यक्ष रोहा सिटीझन फोरम