पुणे : येरवडा येथील पोलीस दलाच्या जमीन प्रकरणामुळे दोन दिवसांपासून वादंग उठलेलं आहे. सरकारी जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी अजित पवारांनी दबाव आणल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांचाही उल्लेख मीरा बोरवणकर यांनी केला.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मीरा बोरवणकर म्हणाल्या की, मॅडम ‘कमिश्नर’ या पुस्तकामध्ये स्त्रीयांचं शोषण, न्याय प्रणाली, भ्रष्टाचार, राजकारण यावर भाष्य केलेलं आहे. तरीही एकच मुद्दा धरुन रान उठवलं जातंय. त्यावेळी येरवडा येथील पोलीस विभागाची जागा बिल्डरच्या घशात जाणार होती. परंतु मी ते हस्तांतरण होऊ दिलं नाही. यावेळी मीरा बोरवणकर यांना तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या म्हणाल्या की, या प्रकरणात आर. आर. आबा यांची भेट घेतली होती. ते म्हणाले, मॅडम तुम्ही याच्यात पडू नका. त्यांनी हे थेट क्लिअर सांगितलं.
”परंतु, मला स्ट्राँगली वाटत होतं की, पोलीस दलाची जागा खासगी बिल्डरला देणं पोलिसांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे मी ते हस्तांतरण होऊ दिलं नाही. आजही अनेक ठिकाणी सरकारी जागांवर बिल्डरांचा डोळा आहे. अनेक अधिकारी मला फोन, मेसेज करुन सांगत आहेत. त्यामुळे मागील सगळ्या हस्तांतरण प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.” असं म्हणत मीरा बोरवणकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.





