बीड : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसला टोला लगावला आहे. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेसने राहुल गांधी यांना निर्णय घेणे शिकवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.बीड येथील सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, “आरएसएसवाल्यांचा नवीन प्रचार सुरु आहे. नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळणार. दोन वर्ष पंतप्रधान राहणार अणि त्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार सुरु आहे. तुम्ही आत्ताच त्यांना हिमालयात पाठवा. देशाचं खूप मोठं भलं होईल.”
“उद्याचा लढा हा मानसन्मान की एक किलोच्या मटणासाठी, निवडणुकीतली दारू पैशांसाठी इमान गहाण ठेवायचा की नाही हे जनतेला ठरवायचं आहे. जर जिंकायचं असेल, तर जो कार्यकर्ता स्वत:ला फुले शाहू-आंबेडकर विचारांचा म्हणवतो. त्याने मनाशी खूणगाठ बांधा. जिंकायचं असेल, तर डोक्यात आराखडा पाहिजे. आरक्षण उपभोगणारा समाज माझ्या लढ्यातील सोबती आहे. मी त्याचा विचार आणि संस्कृतीसोबत स्वीकारेल. तेव्हाच आपण विजयी होऊ”, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
तसेच मुस्लिम जसे म्हणतात की त्यांचा धर्म धोक्यात आहे. हिंदु धर्म इथे धोक्यात नाही. धोक्यात आरक्षणवादी धोक्यात आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ईडीच्या चौकश्यासमोर काँग्रेसमधून कोण कोण गेलं? त्यांना मोदींनी असं म्हटलं की एप्रिलपर्यंत माझ राज्य आहे, तोपर्यंत मी पंतप्रधान आहे. मी सांगतो तसं वागायचं. जर तसं वागायचं नसेल तर तिहार जेलचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे मोदी जो मार्ग सांगतील तो मार्ग हो लोक स्विकारत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राहुल गांधी यांच्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसवाले राहुल गांधी यांचे गुणगान गातात, चांगली गोष्ट आहे. पण काँग्रेसवाल्यांना सांगतो की, राहुल गांधींना निर्णय घेणाचं शिकवा. एका बाजूला राहुल गांधी अदानी विरोधात आंदोलन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी ज्यांच्याशी राजकीय मैत्री केली ते शरद पवार म्हणतात अदानी शिवाय दुसरा चांगला माणूस नाही. त्यांच्यासोबत उद्घाटनाला जाऊन राहुल गांधींच्या छाताडावर नाचायला सुरुवात करतात.”
ज्यांना निर्णय घेता येत नाहीत. तो देशाचं काय नेतृत्व करेल? राहुल गांधींच्या काँग्रेसवाल्यांनी आमच्या नादाला लागू नये. नाहीतर अजून तुमच भिंग बाहेर काढू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.





