बुढ्ढा…! बस्स… नाम ही काफी है ..! – बिग बी अमिताभ बच्चन वाढदिवस विशेष लेख..!

70

बुढ्ढा…!

काय चुंबकत्व असेल या वयाने म्हातार्‍या झालेल्या माणसात?
की दैवी काही असावं..?

असणारंच…!!
त्याशिवाय का तब्बल पन्नास वर्ष, फक्त शिस्तबद्धपणे फक्त आपलं काम-एके-काम करीत, पिढ्यान – पिढ्या लोकांच्या मनात घर करुन राहणं.. हे खायचं काम नाही..!

तो प्रोफेशनल आहे…
बाकी सह कलाकार येवोत न येवोत, दिलेल्या वेळेला तो सेटवर बरोबर हजर असतो. आपलं काम मन लावून करतो व वेळेत निघून देखील जातो.

पिंक… सिनेमात तो उपरोधाने म्हणाला असेल ‘हमारे यहां घडी की सुई कैरेक्टर डिसाइड करती है…’ पण याच घड्याळाच्या काट्यांचा मान तो जीवनभर राखत आलाय.

हे प्रोफेशनलीजम असं शिकता येत नाही. ते मुळात असावं लागतं..आपल्या आत. त्याच्यात ते आहे..अगदी ठासून भरलेलं.

त्याला तुम्ही गायला सांगा तो प्रयत्नपूर्वक चांगलं गाईल..

त्याला नाचायला सांगा तो भगवान दादांपेक्षा कमी नक्कीच वाटणार नाही..!

त्याला फायटींग करायला सांगा ते तो सराइतपणे करेल..अगदी Ambulance घेऊन येइल अन् चार पाच गुंडांना त्यात टाकून घेऊन जाईल. अन् तुम्हाला ते पटेल.. नव्हे तुम्हाला ते पटावं यासाठी तो अधिक मेहनत घेईल.

तो रोमान्समध्ये थोडा बुजरा आहे खरा… पण आपल्या केसाळ अंगासह परवीन, रेखा किंवा स्मिता बरोबर बेड सीन करताना तो त्यात शक्य तितकी आर्तता आणेल.

त्याला न बोलता व्यक्त व्हायला सांगा…
तो शक्ति मधल्या विजय प्रमाणे आपल्या मेलेल्या आईला पहायला येउन, ज्याच्याशी जीवनभर कटुता ठेवली त्या आपल्या बापालाच धीर देऊन जाईल..!

किंवा
शोलेमधे जय बनून विधवा राधाच्या प्रेमात पडेल. कमीत कमी शब्दात, निव्वळ आपल्या देहबोलीतून तिच्याविषयीच्या निर्मळ भावना व्यक्त करत राहील.

अन्  जेव्हा त्याला खदखदत बोलायचं असतं तेंव्हा त्या निद्रीस्त ज्वालामुखीचा उद्रेक पहावा..!

‘मेरे बापने दो शादीयां की थी..एक मेरी मॉं के साथ और एक अपनी नौकरी के साथ. कानून मेरा सौतेला भाई है..!’,  असे म्हणताना कायद्याविषयीची त्याच्या मनातील भयंकर चीड तुम्ही समजून घेता… तुम्हाला ती घ्यावीच लागते.

जीवना विषयीचं एखादं तत्वज्ञान अगदी सहज बोलता बोलता सांगून जावं तर त्यानेच..
‘समय वो पल है, जिसमे एक अजनबी से मोड पर, उधरसे आता अजनबी, इधरसे आते अजनबीको देखकर रुक जाये, और सोचने लगे..हम कभी ना कभी कहीं न कहीं..पहले भी मिल चुके है…’

किंवा हे वाक्य पहा

‘जो जिंदगी भर ढुंढा वो पाया नही.,
और जिसे पाया उसे चाहा नही..’

त्याच्या तोंडी अशी साधं वाक्य द्या अन ते अस्सल चोवीस कैरेट सोनं होउन बाहेर पडतं. फक्त त्याच्या तोंडूनच ते आपण ऐकावं अन तृप्त व्हावं..

Sarcasm किंवा व्यंगात्मक बोलावं तर त्यानेच..

मग तो विनोदी प्रसंग असो..

‘मैने तो ऑंख पहलेही बंद कर रखी है.!’
किंवा
‘तुम्हारा नाम क्या है बसंती?’

किंवा अगदी गंभीर प्रसंग असो..
‘आजकल अपने देश मे काम ढुंढणा भी एक काम है…बस आज कल वही कर रहा हूं..!’

किंवा

‘हमारे मुल्क मे एक आदमी को दस रुपये को ग्यारह रुपये बनाने मे जिंदगी खप जाती है..लेकीन दस लाख को ग्यारह लाख बनाना बाये हाथ का खेल है..!’

असे संवाद तो लिलया म्हणून जातो…
अगदी डोळ्याची पापणी न मिटता…

बाकी त्याला Angree young man बनवणारी त्याची ती तडफदार सारी संवाद फेक सलीम जावेद, कादर खान, राही मसूम रजा, इत्यादी प्रभुतींच्या कृपेने आपण दिवार, शोले, त्रिशुल, काला पत्थर, बेमिसाल, अग्नीपथ या सिनेमांमधून पहातच आपण मोठे झालोय.

संवाद म्हणताना वाक्य पल्लेदार व नाटकी पद्धतीने न म्हणता त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमधे कापत, मधे जिवघेण्या पॉज घेत, श्वासाच्या आवाजातून त्या क्षणीची भावना व्यक्य करत आपल्या खर्जातल्या आवाजाने तो संवाद तो पूर्ण करतो तेंव्हा ‘गेम, सेट अन मॅच’ त्याने खिशात घातलेली असते.

असा ‘तो’..

ऐंशी ब्यांशी वर्षे वय हे खरे तर घरी निवांत बसण्याचे..
थकलेले शरीर व हरलेले मन सांभाळात..
बोलावणे येण्याची वाट पहायचे वय असते हे..
भल्या भल्यांना या चक्रातून सुटका नाही…

पण मग…सगळेच ‘तो’ नसतात…

कट टू १९८२ साल..

मिरज नावाच्या एका छोट्या शहरात..
एका थिएटर बाहेर उभी असलेली ती लहान मुले..
‘अमिता बच्चन’चा पिक्चर बघायला आलेली..
खुद्दार नावाचा सिनेमा..
थिएटर मधे मंतरलेल्या भारलेल्या त्या अवस्थेत..
तो लहान गोवींद मोठा होता…अन अमिताभ बच्चन बनतो..
प्रचंड शिट्ट्या, आवाज, टाळ्या पडतात…
ते पाच वर्षाचं पोरगं त्याला डोळ्यात साठवून ठेवतं..

कट टू…आज

पांढरी दाढी, पांढरे केस, तो जख्ख म्हातारा वकील..
एक अवघड केस लढतोय…
पूर्ण सिनेमात काहीशा दबलेल्या आवाजात तो बोलत राहतो. पण मग त्या मुलींच्या केससाठी तो जेंव्हा कोर्टात उभा राहतो अन थंडपणे आपली नजर सा-या कोर्टावर फिरवत म्हणतो..

” ‘ना’ सिर्फ एक शब्द नही..अपने आपमे एक पूरा वाक्य है..इसे किसी तर्क, स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन या व्याख्या की जरुरत नही होती. No means ‘No’ and when someone says No, you stop.”

थिएटरमधे टाळ्या वाजतात…  काही शिट्ट्या देखील…

६ फूट २ इंच उंचीचा तो सुटाबुटातला म्हातारा शरीराने भले थकला असेल.. पण त्याच्यातलं वादळ अजूनही तसंच शाबुत आहे याची तो प्रचिती देतो. आपण थक्क होउन फक्त पहात राहतो.

अमिताभ बच्चन..!

हे फक्त एक नाव नाही…
हा एक देश आहे..A country in itself
अनेक धर्म, जाती, पंथ व भाषांमधे विभागल्या गेलेल्या
१४० कोटी लोकांच्या देशाचा..

तो एक पूल आहे..
जो जोडतो दुःखाला आनंदाशी..
निराशेला आशेशी..
निरुत्साहाला उर्जेशी..
अपयशाला यशाशी..

‘तो आहे..’ ही एकच गोष्ट बस्स असते या पब्लीकसाठी..

त्या Angry young man चा आता Happy old man झालाय
पण तो आपले काम करणं सोडत नाही..

‘कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती..!’
हे सतत आपल्याला सुनावत राहतो..आपल्या कृतीतूनही..

केबीसीत साठीच्या आजीपासून अठरा वर्षाच्या मुलीपर्यंत..
सा-याच जणी धावत येतात अन त्याच्या गळ्यात पडतात..
तोही त्यांना प्रेमाने अलिंगन देतो व आदराने खुर्चीवर बसवतो
भारावून गेलेल्या त्या जीवांचे भाव समजून घेतो..

आजोबा आपल्या नातवंडांचे कोड कौतुक पुरवतात..

तसे तो त्यांचे हट्ट देखील पुरवत राहतो..

बायको म्हणते म्हाता-याचा उत्साह बघ…

पण खरं सांगायचं तर तो म्हातारा होतच नाहीये..
Actually तुम्ही म्हातारे होताय…

केबीसीचा एपीसोड सपवून तो आपलं शेवटचं मोनोलॉग बोलून थांबतो.

आपल्या कोटाची ती खालची बटणे अलगद लावतो..

आपल्याकडे बघून हसतो अन अचानक डोळा मारतो

अन मोठ्याने हसत आपल्यासारख्या तमाम वेड्यांना म्हणतो..

बुढ्ढा…??

बुढ्ढा होगा तेरा बाप…!!

Happy birthday Young Man…
Amitabh Bachchan..!!

– सुनील गोबुरे