देवगड : तालुक्यातील साळशी प्रशालेत दि. 01 ते 07 ऑक्टोबर,2023 या वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमासाठी श्रीमती -अनिता बोडेकर (वनपाल – देवगड परिक्षेत्र-सामाजिक वनीकरण) व आशा शिंदे (वनपाल – तळेरे परिक्षेत्र – सामाजिक वनीकरण) हे सामाजिक वनीकरणचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी सदर कार्यक्रमास उपस्थित वनाधिकारी यांचे शब्दसुमनांनी मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकेतून व मार्गदर्शनपर व्याख्यानातून वने व वन्यजीव यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी करावयाचे उपाय, प्राण्यांची घट होण्याची कारणे, त्यांचे अधिवास या विषयावर मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी विचार व्यक्त केले.
यानंतर तळेरे वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल आशा शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात तृण व मांसभक्षक वन्यप्राणी यांची माहिती, अन्नसाखळी, प्राण्यांची अन्नसाखळी, प्राण्यांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव व सह्याद्री पर्वत रांगांमधील वन्यजीव यांच्या विषयीची व्हिडिओ क्लिपद्वारे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमांसाठी दोन्ही वन अधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वंजारे, स्वप्निल भरणकर, उद्देश मोरे, सदाशिव भिसे व प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.
शेवटी मुख्याध्यापक श्री. वंजारे यांनी कार्यक्रमास उपस्थित दोन्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांचें आभार मानले.





