कुडाळ : अजित पवार हे सरकार स्थापन होण्यापूर्वी आमच्याबरोबर होते. त्यावेळी भाजप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले; मात्र आज अजितदादांना आपण चुकलो, हे समजले आहे. त्यामुळे अजितदादा सत्तेबाबत नाराज आहेत, हे कालच्या दोन बैठकांमध्ये दिसून आले, असा दावा आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. दसरा मेळावा १९६८ पासून शिवतीर्थावरच होतो, तो तिथेच होईल, असेही ते म्हणाले. आमदार नाईक म्हणाले, ‘‘दसरा मेळाव्यात वर्षभरात कार्यकर्त्यांची उद्दिष्टे, काम याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात. आता शिंदे गट मोदी-शहांना नेते मानतो. मागील वर्षी शिंदे यांच्या भाषणावेळी लोक उठून गेले होते. यावेळी सुद्धा तेच होईल. त्यामुळे नीतिमत्ता असेल, तर शिंदे गट यावेळी दसरा मेळावा घेणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा नाही. येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन मिळत नाही. गर्भवती महिलांना आवश्यक असणारी औषधे उपलब्ध नाहीत. राज्याने नुकताच ”शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम राबविला; पण यासाठी जिल्हा नियोजनमधून १ कोटीचा निधी घेतला. हाच निधी आरोग्यासाठी वापरता आला असता.” दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे उसनवारीत आणणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इतिहास संशोधकांच्या मतानुसार छत्रपतींची ही वाघनखे नाहीत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाले.





