सावंतवाडी : तळवणेत चिरे खाणी असून त्याचा त्रास मात्र साटेली गावातील ग्रामस्थांना होत असून याकडे महसूल अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यास या आरोप साटेली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप जिल्हा सहसचिव संजय नाईक यांनी केला आहे.
तळवणे येथे मोठ्या प्रमाणात चिरेखाणीचे जाळे पसरले असून या ठिकाणी होणाऱ्या उत्खननाच्या वाहतुकीचा त्रास मात्र साटेली गावातील ग्रामस्थांना होत असल्याने त्या त्रासाची कल्पना अधिकाऱ्याना यावी, यासाठी साटेली कातवडवाडीतील कानोळकरवाडीत अधिकाऱ्यांनी दुचाकी घेवून याची पाहणी केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करु, असेही नाईक म्हणाले. सध्या चालू असलेल्या चिरेखाणी यांच्या वाहतुकीचा त्रास हा साटेली गावातील लोकांना, शेतकरी वर्गाला आणि साटेलीतून ये-जा करणारे प्रवासी आणि इतर व्यक्तींना होत आहे. कायद्याचा आणि नियमांचा आम्हाला धाक दाखवणारे जणू आपण धुतल्या तांदळाचेच आहेत, असा आव आणत असून लाखो, करोडोचा चिरेखाण व्यवसाय करुन सामान्य नागरीकांना त्रास देत आहेत. कोणताही व्यवसाय चालू असताना कोणाला नाहक त्रास होऊ नये, याचं भान व्यवसाय करणाऱ्यांनी ठेवले पाहिजे ,असेही नाईक म्हणाले. आम्हाला माहीत आहे, उत्खनन किती आणि महसूल किती जमा होतो. पण आवाज उठवला की, आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळीच करता येणार नाही. चिरेखाणीच्या वाहतुकीमुळे साटेली गावातील नागरिकांना होणारा त्रासाकडे महसूल अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्यात यावा. अन्यथा आरपारची लढाई होईल, असाही इशारा सामाजिक कार्यकर्ते तसा जिल्हा भाजप सहसचिव संजय नाईक यांनी दिला आहे. यामुळे आता महसूल विभागाकडून कोणती कारवाई होते?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





