नवी दिल्ली: भारतात क्रोमबुक तयार करण्याच्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी ‘गुगल’च्या निर्णयाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्वागत केले आहे. गुगलच्या क्रोमबुक उपकरणांची भारतात निर्मिती करण्याच्या योजनेबद्दल कळल्यानंतर आपल्याला आनंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
यासंदर्भात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीवर प्रतिक्रिया देताना आयटी राज्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि PLI धोरणांमुळे, भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात एक पसंतीचा भागीदार म्हणून उदयास येत आहे. यामध्ये IT हार्डवेअर PLI2.0 महत्त्वपूर्ण आहे. PLI ने भारतात लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे.
सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात क्रोमबुक तयार करण्यासाठी HP सोबत भागीदारी करत आहोत. भारतात बनवलेलं हे पहिलं क्रोमबुक असेल. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित संगणकीय अभ्यास करणं सोपं होईल.





