बांदा : गणेशोत्सवाच्या सुरुवातीला सुरू झालेला पाऊस थांबण्याचे काही नाव घेईन. याचा परिणाम भात शेतीवर होणार असून भाताच्या लोंबात पळींज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेती हंगामात पावसाने अनेक वेळा हुलकावणी दिली आणि आता जोरदार बरसू लागल्याने शेतकरी मात्र नुकसानाच्या भीतीने हवालदिल झाला आहे.
मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे.

गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे गणेश भक्तांसह नागरिकही वैतागले आहेत. सद्यस्थितीत भात पिकाला फुल येण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्यात पावसाचे पाणी गेल्यास पिकात पळींज होण्याची शक्यता आहे. जरी लोम भरगच्च दिसले तरी शेतकऱ्याच्या हाती भरीव दाणा कमी व पळींज जास्त येणार आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई प्रशासन कशाप्रकारे देणार, कोणते निकष लावणार हा मात्र गुंतागुंतीचा प्रश्न आहे असे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.
दुसरीकडे नाचणी पिकासाठी पाऊस उपयुक्त ठरत आहे. मात्र सावंतवाडी तालुक्यात नाचणी पेक्षा भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. तसेच कमी प्रमाणात भुईमूग, कुळीथ, वाल आदी पिके घेतली जातात. चतुर्थी पूर्वी पंधरा दिवस पाऊस पडणे अपेक्षित होते मात्र सद्यस्थितीत कोसळत असलेला पाऊस भात शेतीचा हानिकारक आहे. हजारो रुपये खर्च करून केलेली शेती वाया जाणार असल्याच्या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.








