शिरोडा येथे बर्निंग कँटरचा थरार..! ; काल मध्यरात्रीची दुर्घटना.

174

वेंगुर्ले : तालुक्यातील शिरोडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. आरोंदा येथून शिरोडामार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कँटरला शिरोडा बायपास येथे आले असता चालू गाडीने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये कँटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मद्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

रेडी येथील अंकुश उर्फ प्रशांत नाईक यांनी आपल्या मालकीचा एम.एच. ०७ ए.जे. ३७२७ या क्रमांकाचा कँटर चार महिन्यापूर्वी नवीन घेतला होता. काल शुक्रवारी गाडीत असलेले आरोंदा येथील सामान उतरून रात्री उशिरा प्रशांत नाईक गोव्याला जात होते. गाडी शिरोडा बायपास येथे आली असता गाडीतून खालून धूर येऊ लागला आणि बघता बघता चालत्या गाडीने प्रचंड मोठा पेट घेतला. घाबरलेल्या प्रशांत यांनी आपले मामा प्रमोद नाईक यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती दिली. ते येईपर्यंत आगीने रौद्ररूप घेतले होते. आग विझविण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी  प्रयत्न केले. मात्र गाडी आगीत  पूर्ण जळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी सदर घटनेचा  पंचनामा केला आहे.