इळये गावात झाला विधवा महिलांचा सन्मान…!

देवगड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सखी महिला ग्रामसंघ इळये यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. हळदीकुंकू म्हणजे सुहासिनींच लेण असं समजणा-या समाजामध्ये विधवा महिलांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले. विधवा प्रथाबंदी कायदा आलेल्या असतानाही जुन्या परंपरा, रूढी, चालीरीती यांत अडकलेल्या समाजाचा थोडाफार शाब्दिक व मानसिक त्रास होणार हे माहित असूनही महिलांच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटणारे इळये गावचे सरपंच जयदेव कदम यांच्या पाठींब्यामुळेच सखी महिला संघ इळये यांनी चार पाऊले पुढे जाऊन विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून वाण देऊन न थांबता त्या विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरून त्यांचा यथोच्चित सत्कार केला. यामध्ये इळये येथील चार विधवा महिला उपस्थित होत्या.

अशा पद्धतीने साजरा होणारा देवगड तालुक्यातील पहिलांच हळदीकुंकू कार्यक्रम असुन सदर हळदीकुंकू समारंभाला २०० महिला उपस्थित होत्या. २१ व्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही पतीच्या निधनानंतर त्या महिलेला समाजात कोणत्याही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचे ही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे.

विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन सखी महिला ग्रामसंघ अध्यक्षा श्रीम.विनया गावडे यांनी केले. तसेच ग्रामसंघ कोषाध्यक्ष श्रीम.प्रांजली कदम, सचिव श्रीम.वंदना ठुकरूल यांनी या विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून वाण देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. तसेच सी.आर.पी. श्रीम.विदया नाईक, श्रीम.प्राची राणे, वरीष्ठ वर्धिनी श्रीम.यशश्री परूळेकर यांनी त्या विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरून ‘ विधवा ’ या संकल्पनेतून बाहेर काढण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करून आपल्याच कृतीतून समाजासमोर वेगळा आदर्श घालून दिला. त्या चार महिलांपैकी श्रीम.मिनाक्षी कदम या महिलेने आपल्याला या परिस्थितीत समाजाचा किती आणि कसा त्रास झाला हे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू वाहत होते. तिने आपल्या बोलण्यातून शासनाचे व सखी ग्रामसंघाच्या टीमचे मनःपुर्वक आभार मानले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयमान सरपंच श्री.रविंद्र ठुकरूल व ग्रामसेवक उज्वल झरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.