सावंतवाडी : येथील राजवाडा परिसरातील भले मोठे भेडले माडाचे झाड थेट अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या शेजारी असलेल्या परिमल टॉवरसमोर घडली. राहुल प्रकाश पंदारे (वय 25) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय 21) रा. गवळीवाडी अशी या दोघांची नावे आहेत. गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्यासोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील दोघेही मृत युवक गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघात झाल्याचे लक्षात येतात त्या ठिकाणी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, रॉक्सन डान्टस, बाबा अल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण, हेमंत पांगम, विनायक गावस, लादु रायका, मोसीन मुल्ला, अॅलेक्स डिसोजा, आशिष रायकर, अखिलेश कोरगावकर, सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर, नंदू गावकर आदींनी त्या ठि मदत कार्यात सहभाग घेतला. कटरच्या साह्याने झाड कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अमित गोते, सुरज पाटील आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले. दरम्यान यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.





