मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची आज (सोमवारी) सुनावणी होणार असून महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने दोन्ही गटांतील ५४ आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज(ता. २५) दुपारी तीन वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावले आहे. अपात्रतेसंबंधीच्या पूर्वीच्या सर्व याचिका एकत्र करून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
अपात्रतेसंबंधीच्या याचिका क्रमांक १ ते ३४/२०२२ यांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार असून आपण यावेळी उपस्थित राहावे,’ असे नोटिशीत म्हटले आहे. सुनावणीच्या कामी गरज पडल्यास दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही बोलाविण्यात येणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादेत सुनावणी घेण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे.









