मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील शेख कुटुंबीय गेल्या तीन पिढ्या पासून हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा गौराईचा सण गौराईची प्रतिष्ठापना करून साजरा करतात. सामाजिक सलोखा राखणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, टाकळी सिकंदर गावचे ग्रामदैवत “सिकंदर बाबा” आहे. गावात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. सिकंदर बाबा यात्रेच्या वेळी कुठलाही जातीभेद न करता सर्व गावकरी त्यात सहभागी होतात. त्यामुळे या गावात सामाजिक सलोखा असल्याचे अधोरेखित होते. याच पार्श्वभूमीवर टाकळी येथील बाबासाहेब शेख, जुम्मेखान शेख व त्यांचे सर्व कुटुंबीय गेल्या तीन पिढ्यापासून हा सण साजरा करतात.
पहिल्या पिढीतील महाजन शेख, दुसऱ्या पिढीतील आबालाल शेख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व ही परंपरा पुढे नेत आता तिसऱ्या पिढीतील बाबासाहेब शेख व त्यांचे सर्व कुटुंबीय हा उपक्रम कायम राबवितात. जातीय सलोखा राखून समाजात एकोप्याचा संदेश देणाऱ्या शेख कुटुंबीयांचे माजी तालुका पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, हिम्मत पाटील, सिराज तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य श्रीपाल वसेकर, सयाजी पाटील यांनी सत्कार केला.








