दीड दिवसांच्या बाप्पाचे सावंतवाडी शहरासह तालुक्यात भावपूर्ण विसर्जन.!

36

सावंतवाडी : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!”, अशा जयघोषात आज दीड दिवसांच्या गणपतीचे सावंतवाडी शहरासह तालुक्यात विसर्जन करण्यात आले. तर काल मंगळवारी श्री गणेशांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोठ्या आनंदात, जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून घरोघरी भजनादीक कार्यक्रम सुरू झाले आहेत.

दरम्यान शहरातील मोती तलावाच्या विसर्जन स्थळी पुष्पवृष्टी करण्यात येत आहे तर परिसरात रोषणाई, पुष्पमाला लावण्यात आल्या आहेत.

प्रचंड महागाई आणि दुष्काळी सावट असूनही सावंतवाडी तालुक्यात घरोघरी गणपतीचे पूजन करण्यात आले आहे. दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवस गणपतींचा मोठ्या प्रमाणात मुक्काम असणार असून गणपतीचे आगमन आणि विसर्जन धुमधडाकात आणि जल्लोषाचं करण्यात येत आहे.

काल मंगळवारी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर आरती, भजन कार्यक्रम झाले आणि आज सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सावंतवाडी शहरात मोती तलावात तर ग्रामीण भागामध्ये नदी नाल्यांमध्ये गणपतीचे सामूहिक विसर्जन करण्यात आले. बालगोपाळांपासून वृद्धा पर्यंत गणपतीचे आगमन व विसर्जन प्रसंगी आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी बहुतेक सामूहिक गाऱ्हाणे गणपती स्थळी मांडण्यात आले. घरोघरी उकडीचे मोदक व विविध पदार्थ नैवेद्यासाठी गणपती चरणी ठेवण्यात आले होते.

सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर नगरपरिषदेच्या मदतीने शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पवृष्टी करण्यासाठी कोल्हापूर येथील खास पथक पाचारण केले. काठावर पुष्पमाला रोषणाईमुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली आहे. केसरकर यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

दक्षिण कोकणातील सावंतवाडी संस्थानच्या वतीने श्री गणेशाचे पूजन करण्यात आले होते. या मंगलमूर्तीचा रंग लाल आहे. आज दीड दिवसांनंतर विसर्जन करण्यात आले. यावेळी खास बँड पथकाने वाजत गाजत श्री मंगलमूर्ती मोती तलावाच्या काठावर आणली. यावेळी श्रीमंत खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले यांनी उपस्थिती दर्शविली. यानंतर विसर्जन करण्यात आले. नगरपरिषद प्रशासनाने पुष्पवृष्टी यावेळी केली. तसेच बोटीवर बसवून मुर्ती मोती तलावाच्या मध्यभागी विसर्जन करण्यात येत आहे. नगरपरिषद कर्मचारी आरोग्य निरीक्षक श्री. नाटेकर, दीपक म्हापसेकर व अन्य उपस्थित होते.