सलाम.!, जम्मू-काश्मिरमध्ये भारतीय सेनेचे शौर्य.! ; एका वर्षात ४९ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी.!

33

जम्मू : सुरक्षा दलांनी या वर्षी जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 49 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलय. जम्मू आणि काश्मिरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले की, ‘टीम जम्मू-काश्मिर’ राज्य दहशतवादमुक्त करण्यासाठी ‘युनिक मॉडेल’ म्हणून एकत्र काम करत आहे. यामध्ये जम्मू-काश्मिर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, भारतीय सेना, गुप्तचर संस्था आणि नागरी प्रशासन यांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या तिसऱ्या उत्तर विभागीय पोलीस समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

दिलबाग सिंह म्हणाले की, एक वेळ अशी होती की दर शुक्रवारी सुरक्षा दलांवर दगडफेक होत होती. डीजीपी म्हणाले की आता सर्व संपलय. त्यांनी दावा केला की, ‘जम्मू आणि काश्मीर सुरक्षा दल मानवाधिकारांचे शून्य उल्लंघन सुनिश्चित करण्यास सक्षम आहे.

गेल्या काही वर्षांत कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित कोणत्याही कामात एकही नागरिक जखमी झालेला नाही. जम्मू-काश्मिरमध्ये शून्य दहशतवादाच्या धोरणाकडे आम्ही हळू हळू पुढे जात आहोत. जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद सर्वात खालच्या पातळीवर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

40 परदेशी आणि 9 स्थानिक दहशतवादी ठार..

डीजीपी दिलबाग म्हणाले की, यावर्षी जम्मू-काश्मीर सुरक्षा दलाने 40 विदेशी आणि 9 स्थानिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे . दहशतवादी कारवायांमध्ये स्थानिकांच्या सहभागात मोठी घट झाल्याचा दावा त्यांनी केला. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत उत्तरेकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागांचे प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ अधिकारी आणि CAPF अधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी सिंह म्हणाले की, सुरक्षा दलांमध्ये उत्कृष्ट समन्वय आहे ज्यामुळे दहशतवाद्यांना गाव आणि शहरांमधून डोंगराकडे ढकलण्यात मदत झाली आहे. ते म्हणाले की लोकांचे सहकार्य मिळाल्याने सैन्याला खूप मदत झाली, त्यासाठी आम्ही जम्मू-काश्मिरच्या लोकांचे आभार मानतो.