मुंबई : संजय राजाराम राऊत यांना सांगा की तुम्हाला गावी जायचं असेल तर जा, आम्ही ट्रेन बुक केली आहे. तीन सीट बाकी ठेवल्या आहेत. तुम्हाला जायची तिकीट आम्ही देतो अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.मुंबई – गोवा महामार्गावरून राजकारण तापलेले असताना खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं.
आमदार नितेश राणे म्हणाले की, “यापूर्वी आम्ही सहा ट्रेन सोडल्या आहेत. आम्ही 250 बसेस सोडतोय, रेल्वे गाड्या सोडतोय, गणपतीच्या काळात आम्ही या सेवा देतोय. टीका करणाऱ्यांनी किमान ट्रेन सोडून दाखवाव्यात. त्यांना गावी जायचं असेल तर त्यांच्यासाठी राखीव सीट ठेवली आहे.”
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सध्या चाकरमान्यांची सुरु आहे. मुंबई भाजपच्या वतीने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी तीन दिवस सहा विशेष ‘नमो एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका..
आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, पेंग्विन जर कोकणात येत असेल तर लोकांनी किमान घरात चार एसी लावाव्यात. कारण पेंग्विन एसी शिवाय जगू शकत नाही.






