सावंतवाडी : क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे कनेडी विदयामंदिर, कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडेमीच्या जिल्हाभरातील बावीस विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यावर्षी जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ॲकेडेमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ॲकेडेमीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू कु. साक्षी रमेश रामदुरकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू कु. विभव विरेश राऊळ यांनी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील चौदा वर्षाखालील गटात निर्विवाद वर्चस्व राखत प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय कॅरम खेळाडू कु. क्षितीजा मुंबरकर, बुद्धिबळ खेळाडू कु. राजेश विरनोडकर यांच्यासोबत अकरा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवले.या सर्व विदयार्थ्यांची विभाग स्तरावर निवड करण्यात आली.
या सर्व विद्यार्थ्यांना मुक्ताई अकॅडेमीचे कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विदयार्थ्यांचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे, राणी सरकार शुभदादेवी आणि राजे सरकार बाळराजे यांनी कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी मुला – मुलींसाठी गणेश चतुर्थीपासून कॅरम, बुद्धिबळ, अभिनय, नृत्य, इत्यादी उपक्रमांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.सहभाग घेण्यासाठी 8007382783 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.





