मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणं पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ठाकरेंना चहुबाजूंनी शाब्दिक हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी ठाकरेंना इशाराही दिला. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी निशाणा बनवलं.
शिंदे सर्वकाही सहन करताहेत…
मंत्री राणे म्हणाले, “एकनाथ शिंदे सहन करत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण एकनाथ शिंदेंना सांगेन एक दिवस असं करा, यांचं मातोश्रीवरच सुरक्षा कवच काढून घ्या. कोणीही काहीही न करता मातोश्रीत बेशुद्ध पडेल हा माणूस, एवढा घाबरट आहे हा.”
तीन मार्गदर्शकांचा टेकू..
आता सध्या दोन बाहेरचे आणि एक घरातला असे तीन मार्गदर्शक यांना टेकू लावून आहेत, त्यापुढे हे चालतात. संजय राऊत, शरद पवार आणि मातोश्रीवरचा एक. त्यामुळं आम्हाला जास्त बोलायला लावू नका, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
लंडनला का जाताहेत हे बाहेर येईल..
दरम्यान, उद्धव ठाकरे लंडन का जाताहेत, तिकडं काय काय चाललंय, हे आज ना उद्या बाहेर येईल. काहीही सिक्रेट राहत नाही. बरेचशे कागद माझ्याकडं आले आहेत, मी योग्य जागी ते पोहोचवले आहेत. यानंतर त्यांना सहजासहजी झोप येणार नाही, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.






