संगीत खुर्चीचा खेळ संपवून गावातील प्रश्नांकडे आरवली ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे.! – मनसेचे चिपकरांची मागणी.

41

वेंगुर्ला : आरवली ग्रामपंचायतमधील संगीत खुर्चीचा खेळ संपला असेल तर गावातील प्रश्नांकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेचे वेंगुर्ला माजी तालुका सचिव राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केली आहे.

आरवली गावात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट रस्त्यालगतची गटारे अशा विविध प्रश्नांसाठी श्री. चिपकर यांनी लक्ष वेधले आहे. आरवली रस्ता हा मागील अडीच वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. अजून देखील ते काम पूर्ण झाले नसून रस्ता कागदावरच आहे, तो पूर्णत्वास कधी येईल? असा प्रश्न आबा चिपकर यांनी उपस्थित केला.  त्याचप्रमाणे काही दिवसात चतुर्थी हा सण आला असून गावात मोठ्या प्रमाणात चाकरमनी दाखल होतात तर रस्त्याची दुर्दशा पाहून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यास जबाबदार कोण? दुतर्फा झाडीही वाढली आहेत, तर चतुर्थीपूर्वी या सर्व बाबींकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी मनसेच्या वतीने चिपकर यांनी केली आहे.

गावातील एसटी बस सेवा रस्त्या अभावी मागील कित्येक महिने बंद आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्याचा भुर्दंड  बसत आहे तर निवडून दिलेल्या सदस्यांनी सरपंच पदासाठीच संगीत खुर्चीचा खेळ संपला असेल तर गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, व तात्काळ या बाबींची दक्षता घ्यावी. तसेच सदर कामे मार्गी लागावीत, अशी मागणी श्री. चिपकर यांनी केली आहे.