सिंधुदुर्ग : कोरोनानंतरच्या कालखंडात खाजगी सावकार, फायनान्सवाले यांची गुंडगिरी गावोगावी वाढलेली आहे. मात्र पोलिसांनी याची कुठेही गंभीरपणे दखल घेतलेली नाही. याचा परिणाम म्हणून काल रानबांबुळी गावात “कोटक महिंद्रा बँकेचे” नाव सांगत वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईच्या ठिकाणी येण्यापेक्षा, ग्रामपंचायतीत या म्हणाले म्हणून ग्रामपंचायतीत घुसून मारण्याची धमकी देण्यात आली. लोकनियुक्त सरपंच पदाचा अवमान करत “सरपंच हे चोर असतात, आमचे नोकर असतात” असे बदनामकारक वक्तव्य करत शिवीगाळ गुंड प्रवृत्तीच्या वसुली कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आली. वास्तविक कर्जप्रकरण कोणाचे आहे हे जाणून घेणे सरपंचाचा अधिकार आहे, पण अशा सरपंचाला शिवीगाळ करणे, ग्रामपंचायतीत घुसून मारहाण करण्याची धमकी देणे असे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असतील तर अशा गुंडांकडून सामान्य कर्जदार सुरक्षित आहे का याचा विचार पोलिसांनी करावा. त्यातही या प्रकरणात “कोटक महिंद्रा बँकेचे” नाव येते आहे आणि पोलीस संरक्षण असल्याचा उल्लेख संभाषणात आहे. साहजिकच, “कोटक महिंद्रा बँक” आणि पोलिस खाते या प्रकरणी उत्तर देण्यास बांधील असे महाराष्ट्र लोकाधिकार समिती यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .
गेल्या काही कालावधीत जिल्ह्यात झालेल्या आत्महत्या पाहता त्यामागे अशा गुंडप्रवृत्तीचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. आर. आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी “अशा वसुलीवाल्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढले पाहिजे” असे उद्गार काढले होते. कर्जदारांनी आता आत्महत्येची वेळ आणणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात माजी गृहमंत्री श्री. आबा पाटील यांच्या आदेशाच्या मार्गावर चालायचे का, याचे उत्तर पोलीसांनी द्यावे.
रानबांबुळी प्रकरणी वसुलीच्या नावावर दादागिरी करणाऱ्या त्या सराईत गुंडांवर कठोर कारवाई करण्याबाबत “महाराष्ट्र लोकाधिकार समितीने” पोलिसांना निवेदन दिलेले आहे. मात्र कठोर कारवाई न झाल्यास जनतेला आमच्या स्टाईलने न्याय मिळवून द्यावा लागेल. कारण आम्हाला गोरगरीब जनतेच्या आत्महत्या रोखायच्या आहेत आणि कायदा हा अशा गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी असतो. पोलिसांनी तसेच “कोटक महिंद्रा बँकेने ” गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात कोणतीही वेगळी पूर्वसूचना न देता आंदोलन छेडले जाईल, तसेच “कोटक महिंद्रा बँकेला” काळे फासून निषेध नोंदवला जाईल, असा इशारा “महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे” महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅड. श्री. प्रसाद करंदीकर यांनी दिला आहे.





