दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आदर्श उपक्रमासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केर – भेकुर्ली ग्रामपंचायतीने हळदीकुंकू कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. यावर्षी महिलांनी हळदीकुंकूवादिवशी हरितगाव आणि स्वच्छ गाव राखण्याचा संकल्प केला. त्या अनुषंगाने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणही केले एवढेच नव्हे तर वृक्ष जगविण्याचे नियोजनही केले.
त्यामुळे “हळदीकुंकवाचे वाण, देईल जन्मभर आठवण” चा संदेशही यानिमित्ताने मिळाला. युवावर्ग, महिला, माता, भगिनी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आज हळदी कुंकू समारंभ उत्तमरित्या पार पडला. महिलांना वाण दिलेच, याशिवाय महिलांनी हळदी कुंकू वेगळा संदेश देणारा ठरला महिलांनी वृक्षारोपण करत वाण कायमीस्वरूपी यादगार राहण्यासाठी सुपारी रोपे चव्हाटा मंदिर परिसरात लावली शिवाय, स्वछ गाव, हरित गाव चा संकल्पही महिलांनी केला. ग्रामपंचायत, आदर्शगाव समिती, संजीवनी बहूद्देशीय संस्था, वनश्री फाउंडेशन आणि नेफडो यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून संजीवनी संस्थेच्या सौ. दीक्षित यांसह महिला उद्योजकता प्रशिक्षक सौ. विनिता देसाई यांनी महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन करीत स्वावलंबनचा धडे दिले. संजीवनी संस्थेने महिलांना हळदीकुंकू वाण म्हणून सुपारी रोपे दिली ती महिलानी केर चव्हाटा मंदिर, ग्रामपंचायत, जि. प. शाळा केर नं एक, जि. प. शाळा निडली, जि. प. शाळा भेकुर्ली येथे वृक्षारोपण केले. तसेच गाव स्वछतेत महिलानी आपण पुढाकार घेण्याचा संकल्प केला.





