बांदा : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबागच्या वतीने बांदा स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान व वृक्षसंवर्धन उपक्रम करण्यात आला. श्री. बैठक बांदा तसेच तळवडे व आजूबाजूच्या गावातील सुमारे 150 श्री सदस्यांनी या अभियानात भाग घेतला.
सकाळी लवकर या अभियानास आरंभ झाला. बांदा स्मशानभूमीचा आतील व बाहेरी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. श्री सेवकांनी झाडी, कचरा, माती, गवत सर्व साफ केले. प्रतिष्ठानच्या वतीने 2018 सालात बांदा स्मशानभूमीत 250 झाडे लावली होती. सलग पाच वर्षे प्रतिष्ठानतर्फे दर रविवारी सकाळी दोन तास या झाडांची निगा राखली जात आहे. आज 5 वर्षांनी हे सर्व 250 वृक्ष बहरत आहेत. या अभियानात या सर्व झाडांची देखभाल करुन त्यांना कुंपणही करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे निष्काम सेवा करत सामाजिक व आरोग्य विषयक कित्येक उपक्रम वर्षभर सातत्याने सुरु असतात. बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी या अभियानाला भेट दिली व डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी निष्काम उपक्रमाचे कौतुक करुन बांदा ग्रामपंचायत व बांदा ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त केले.






