रोहा : शशिकांत मोरे
वर्षभरात श्रावण महिन्याची विशेष अशी ओळख आहे.या महिन्यात रक्षाबंधन नारळी पौर्णिमा झाली की तरुणांना वेद लागतात ते ढाकु माकुमचे.अर्थात कृष्णजन्म झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोकुळाष्टमी गोपाळकाला हा गावोगावी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याची तयारी म्हणून रोह्यात गोपाळकाला साठी रंगीबिरंगी मडकी बाजारात विक्रीला ठेवण्यात आली आहेत.

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भगवान श्री कृष्णाचे जन्मोत्सव गोपाळकाला गोविंदा निमित्ताने दहीहंडी बांधल्या जातात.या बांधलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी उंच उंच मनोरे उभारून बालगोपाल मोठ्या उत्साहाने आगेकुच करताना दिसतात.याच दहीहंड्यासाठी लागणारी रंगीबिरंगी मडकी बाजारात जागोजागी विक्रीला आहेत.या रंगीबिरंगी मडक्याना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ते खरेदी साठीही ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसते.

रोहे बाजार पेठेमध्ये नगर पालिका,दमखाडी नाका,सागर डेअरी आदी ठिकठिकाणी हंडी मडके विकण्यास कुंभार समाज बांधव सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.मात्र बनविण्यासाठी लागणारा माती,वेळ,रंग आणि वाढती महागाई लक्षात घेता लहान आकाराची मडकी ८० ते १५० रुपये पर्यंत तर मोठ्या आकाराची मडकी ही १५० ते २५० रुपया पर्यंत मिळत आहेत.त्यातच लागणारे नायलॉन दोरी बरोबर वापरात येणारे वेगवेगळे टि शर्ट,रंगी बिरंगी दुपट्टे सुद्धा वाढत्या दरात मिळत आहेत.





