एअर होस्टेस गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली.! ; सफाई काम करणारा इसम अटकेत..!

132

मुंबई  : मुंबईतील पवई परिसरात 23 वर्षीय एअर होस्टेसची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये संबंधित एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आला. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे.

हवाई सुंदरीची गळा चिरुन हत्या

मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मृत एअर होस्टेस राहत होती. रुपल ओगरे असं तिचं नाव होतं. राहत्या घरी मध्यरात्री तिचा मृतदेह सापडला. गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पवई पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली.

इमारतीमध्ये साफसफाई करणारा इसम ताब्यात

पोलिसांच्या तपासादरम्यान एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशीअंती हत्येचं मूळ कारण समोर येईल. बहिण आणि मित्रासोबत राहत होती, परंतु ते दोघे गावाला गेले होते. एअर होस्टेस रुपल ओगरे घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली.