मुंबई : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते. लाठीमारात अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
मुंबईतून आदेश आल्यावरच लाठीचार्ज झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अंतरवली येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. “जालन्यात जे घडले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. लाठीचार्ज खूप क्रूर होता जणू काही तुम्ही तुमच्या शत्रूवर हल्ला करत आहात. आंदोलक संवेदनशील मुद्यांवर आंदोलन करत होते. मुख्यमंत्र्यांना न सांगता पोलिस लाठीमार करतील हे शक्य नाही. राज्य सरकारला थोडी लाज असेल तर राजीनामा द्यावा”, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.





