सावंतवाडी : तालुक्यातील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुषमा मांजरेकर यांना राज्याचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. आज प्राध्यापिका सुषमा मांजरेकर यांनी वर्गात आगमन केल्याबरोबर त्यांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्राध्यापिका मांजरेकर यांचे डोळे चांगलेच पाणावले.

आरोस प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेवर पुष्पवृष्टी करून आपल्या शिक्षिकेबद्दल एक प्रकारची भावनिक कृतज्ञता व्यक्त केली. प्राध्यापिका मांजरेकर यांना नुकताच राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले पुरस्कार जाहीर झाला असून ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार मुंबई येथे प्रदान केला जाणार आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.





