१२२ वर्षांनी पुन्हा एकदा कोरडा ऑगस्ट !

41

पुणे : ईशान्येकडील राज्यांमध्येच पाऊस पडत असून, आसाममध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश वगळता देशात अन्यत्र पाऊस नाही. यंदाचा ऑगस्ट महिना हा १९०१ सालानंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे.तापमानाच्या दृष्टीनेही मावळता ऑगस्ट इतिहासातील सर्वात उष्ण ऑगस्टही ठरू शकतो. ऑगस्टचे सरासरी तापमान २७.५५ अंश असते; मात्र या महिन्यातील आतापर्यंतची सरासरी यापेक्षा जास्त आहे.

ऑगस्टच्या २५ दिवसांत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये मान्सूनने तिसऱ्यांदा थांबा घेतला तो अजूनही आठवडाभर सुरू राहाणे शक्य आहे. ऑगस्ट अखेरीस, मान्सूनचा हा थांबाही इतिहासातील चौथा सर्वात मोठा थांबा ठरेल. ऑगस्टमध्ये ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस झाला तरी तो ही घट भरून काढणे शक्य नाही. अशीच स्थिती राहिल्यास गेल्या ८ वर्षांतील हा सर्वात कमी पाऊस असेल. ४ सप्टेंबरनंतर या हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात १० दिवस मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे. साधारणपणे, १७ सप्टेंबरपासून देशातील मान्सूनची माघार पश्चिम राजस्थानमधून सुरू होते, मात्र हवामान विभागाच्या मते यंदा मान्सूनच्या माघारीची स्थिती सध्या अनिश्चित आहे.